26 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ११

दिव्य अशा श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य आजवर असंख्य संत-महात्म्यांनी कथन केलेले आहे. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या पुस्तकात श्रीसंत तुकाराम महाराजांच्या चरित्रातील एक सुंदर प्रसंग कथन केला आहे. ही कथा फारशी प्रचलित नसल्याने नवीनच वाटेल. आज या कथेद्वारे आपण श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य जाणून घेऊ या.
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या चरित्रात एक बहारीची कथा आलेली आहे. ते नेहमी म्हणत की, “श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणजे भवरोगाचा नाश करण्याचे शस्त्र आहे; आणि कलीवर मात करण्यासाठीच आम्हांला श्रीभगवंतांनी ते दिलेले आहे !”
श्री तुकाराम महाराजांची ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’ वर अत्यंत प्रीती होती. ज्यावेळी त्यांच्या लेकीचे लग्न ठरले, त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. म्हणून त्यांनी नवऱ्या मुलाला सांगितले की; “मी तुम्हांला लौकिक असा हुंडा काही देऊ शकणार नाही. पण स्वेच्छेने, आनंदाने जो काही हुंडा देईन त्याने तुमचे जसे कल्याण होईल तसे जगात दुसरे कोणीही करू शकणार नाही. हे मान्य का ?” त्यावर नवरदेव म्हणाला; “ठीक आहे, मान्य आहे !”
श्रीमहाराजांनी मग लग्न लागल्यानंतर त्याच्या हातात स्वहस्ताक्षरातील ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’ची पोथी दिली. तो ‘हुंडा’ जावयाच्या हाती देताना ते म्हणाले; “हा घ्या हुंडा. याचे जर नियमाने पारायण केलेत, तर तुमचे कोटकल्याण होईल !” आणि त्यांच्या जावयानेही पुढे खरेच ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’ची पारायणे करून स्वतःचे कल्याण साधून घेतले.
पू.दादांनी सांगितलेली ही मार्मिक कथा नक्कीच विचार करण्यासारखी आहे. आपल्याकडेही अधिक महिन्यात काही ना काही वाण देण्याची प्रथा आहे. अनारसे, बत्तासे अशा नाशिवंत पदार्थांचे वाण देण्यापेक्षा, देणा-याचे व घेणा-याचेही कोटकल्याण करणारे असे विष्णुसहस्रनामासारखेच अलौकिक वाण आपणही दिले-घेतले तर? आपल्या व आपल्या संपर्कातील सर्वांच्या शाश्वत कल्याणाचाच आपण विचार करायला हवा आणि सतत त्यासाठीच मन:पूर्वक प्रयत्नशील राहायला हवे ! म्हणजे मग मोठ्या भाग्याने लाभलेल्या या मनुष्यजन्माचे सार्थक झाल्यासारखे ठरेल.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


0 comments:

Post a Comment