16 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १


आजपासून विलंबीनाम संवत्सरातील अधिक ज्येष्ठ मास सुरू होत आहे. अधिकमासालाच मलमास असे म्हणतात. भगवान श्रीमहाविष्णूंनी या मलमासाला आशीर्वाद दिले की, "जे भक्त या महिन्यात माझे मनोभावे स्मरण करतील, माझी ज्याप्रकारे शक्य होईल त्याप्रकारे भक्ती करतील, माझ्या प्रीत्यर्थ दान-धर्म करतील, त्यांना मी त्याचे अक्षय फल प्रदान करीन, त्यांच्यावर भरभरून कृपा करीन." पुराणपुरुषोत्तम भगवान श्रीमहाविष्णूंच्या अशा वरदानामुळेच अधिक महिना " पुरुषोत्तम मास " म्हटला जातो. म्हणून आपणही या पावन महिन्यात जास्तीतजास्त भगवन्नाम घेऊ या, यथाशक्य उपासना, पूजा-अर्चना, दानधर्म करून श्रीभगवंतांची अमोघ कृपा संपादन करू या. अधिकस्य अधिकं फलम् । या न्यायाने त्याचे आपल्यालाही अधिकाधिक फल प्राप्त होईल. 

श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्त्व प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांचा श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य या नावाचा एक अतिशय सुंदर व महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथात श्रीविष्णुसहस्रनामातील श्रीभगवंतांच्या पहिल्या तीन नामांवरील दोन प्रवचने प्रसिद्ध झालेली आहेत. तसेच श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या सहस्रनाम भाष्यातील निवडक भाग, पूर्ण सहस्रनाम व त्याचा अर्थ आणि तुलसीअर्चनासाठी सहस्रनामावली देखील छापलेली आहे. एकप्रकारे विष्णुसहस्रनामाचा हा अत्यंत उपयुक्त असा देखणा संदर्भग्रंथच ठरलेला आहे. 
या ग्रंथात पू.दादांनी महान प्रभावी अशा श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य, अद्भुत चमत्कार व सत्यघटना सांगून फार नेमकेपणाने प्रतिपादित केलेले आहे. अतिशय वाचनीय व संग्रही ठेवावाच असा हा ग्रंथराज उपासकांसाठी अनेक अंगांनी विशेष ठरतो.
या ग्रंथात पू.दादांनी त्यांच्या गुरुपरंपरेने आलेले सहस्रनामातील श्लोकमंत्रांचे विविध आजार व अडचणींवरचे अद्भुत मंत्रप्रयोगही दिलेले आहेत. हे मंत्रप्रयोग यापूर्वी कधीच कुठेही प्रकाशित झालेले नाहीत. या महासिद्ध मंत्रांची ( आवश्यक ते साधे सोपे नियम पाळून ) उपासना करून कोणीही भाविक स्त्री-पुरुष त्यांचे अद्भुत अनुभव स्वत: घेऊ शकतात. आजवर हजारो भक्तांना या स्तोत्राच्या लक्षावधी अनुभूती आलेल्या आहेत व पुढेही येतीलच. 
या पुण्यपावन अधिक महिन्याच्या निमित्ताने, पू.दादांनी सांगितलेल्या त्या अलौकिक मंत्रांची दररोज एकेक करून माहिती घेऊ या. कृपया ही मौलिक माहिती अधिकाधिक भाविक भक्तांपर्यंत पोहोचवून पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने हरिसेवा साधावी ही सप्रेम प्रार्थना ! 
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )



0 comments:

Post a Comment