22 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ७

'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'तील 'अच्युत, अनन्त आणि गोविन्द' ही तीन नामे सर्व प्रकारचे रोग नष्ट करणारी म्हणून प्रख्यातच आहेत. प्रत्यक्ष भगवान श्रीधन्वंतरींनीच या संबंधात असे म्हटले आहे की;
अच्युतानन्तगोविन्दनामोच्चारणभेषजात् ।
नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम् ॥
"अच्युत, अनन्त आणि गोविन्द या नामांच्या उच्चारणरूपी औषधाने सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. हे मी सत्य, सत्यच सांगत आहे !"
'पद्मपुराणा'च्या उत्तरखण्डातील दोनशे बत्तिसाव्या अध्यायात, याच संदर्भात भगवान श्रीशिवांचे अशाच अर्थाचे अभिवचन येते. भगवती पार्वतीमातेच्या विचारण्यावरून ते अगोदर मत्स्य, कूर्म आदी अवतारांचा सविस्तर वृत्तांत सांगतात; आणि तदनंतर समुद्रमंथनाचा प्रसंग कथन करतात. त्या प्रसंगी प्रकट झालेले भयंकर कालकूट विष त्यांनी श्रीभगवंतांच्या याच तीन नामांच्या जप-प्रभावाने पचवले होते, असे ते सांगतात. ते त्याचवेळी पुढे असेही सांगतात की; "अच्युत, अनन्त आणि गोविन्द ही श्रीहरींची तीन ( विशिष्ट सामर्थ्यशाली ) नामे आहेत. जो कुणी एकाग्र चित्ताने यांच्या आदी 'प्रणव' व अंती 'नमः' लावून भक्तिपूर्वक जप करतो, त्याला विष, रोग आणि अग्नीपासून मृत्यूचे भय राहत नाही. जो या तीन नामरूपी महामंत्रांचा एकाग्रतापूर्वक जप करतो, त्याला काल आणि मृत्यूचेही भय उरत नाही; मग इतर गोष्टींमुळे निर्माण होणारे भय तर सोडाच !" (पद्म.पु.उत्तर.२३२.१९-२१)
भगवान श्रीशिवांच्या कथनाप्रमाणे 'ॐ अच्युताय नमः, ॐ अनन्ताय नमः, ॐ गोविन्दाय नमः असे ते तीन नाममंत्र असून, याच विशिष्ट क्रमाने त्यांचा जप करावयाचा असतो.
'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'तील प्रत्येक नामाला चतुर्थी प्रत्यय लावून, आरंभी 'ॐ' व शेवटी 'नमः' म्हटल्याने त्यांचे नाममंत्र तयार होतात. सगळ्या हजार नामांचा या प्रकारे मंत्रस्वरूपात उच्चार करीत, भगवान श्रीविष्णूंच्या मूर्तीवर अथवा यंत्रावर तुलसीपत्रे वाहत गेल्यास, हजार यज्ञ केल्याचे श्रेय मिळते असे महात्मे सांगतात.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

0 comments:

Post a Comment