18 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ३


भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने धर्मराजाने भीष्मपितामहांना विविध प्रश्न विचारून ज्ञान मिळवले. सर्व दृष्टींनी पवित्र करणारे असे सारे धर्मज्ञान ऐकल्यानंतर, युधिष्ठिरांनी पुढे होऊन पितामह भीष्माचार्यांना पुन्हा असा प्रश्न केला की, "आपल्या मताने परम धर्म कुठला ?" त्याच वेळी ते आणखीही एक प्रश्न विचारतात की, "कशाचा जप केला असता प्राणिमात्रांची जन्म-मरणांच्या बंधनापासून सुटका होते ? या संसाराच्या पाशातून सुटका होते ?" याशिवाय; "सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले ?", "सर्वांचा आश्रय कोण ?", "कुणाची स्तुती करावी ?"; आणि "कुणाची पूजा करावी ?" असे आणखी चार; म्हणजे एकूण सहा प्रश्न; युधिष्ठिर पितामह भीष्मांना विचारतात. त्यावर उत्तर म्हणूनच श्री भीष्माचार्यांनी त्यांना हे 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र' सांगितलेले आहे.
हे स्तोत्र जरी महाभारत काळापासून प्रचलित झाले असले, तरी त्यातली नामेही त्याच काळातली आहेत असे नाही. श्रीभगवंतांची ही नामे अनादिकालापासून प्रचलित आहेत. त्या नामांवर नाना कल्पांमध्ये ऋषींनी तप केलेले आहे. केवळ श्री भीष्माचार्यांनी ही नामे एकत्र करून सांगितली म्हणून ती मंत्ररूप झालीत असे नव्हे, तर ते त्या नामांचे अंगभूत सामर्थ्यच आहे. ऋषींनी आपल्या तपाने ते सामर्थ्य प्रकट करविले; तर श्री भीष्मांनी मंत्रशास्त्रानुसार त्यांचे विशिष्ट गुण जाणून, त्यांना शास्त्रीय पद्धतीने आणि खुबीदारपणे काव्यरूप देत एकत्र गुंफले.
यातले प्रत्येक नाम श्रीभगवंतांचे कुठले ना कुठले तरी वैशिष्ट्य सांगणारेच आहे. कारण श्रीभगवंतांचे गुणही त्यांच्याप्रमाणेच अनंत आहेत. श्रीभगवंतांचे कुठलेही नाम त्यांचे गुण, त्यांच्या विभूती, त्यांचे अवतार, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे ऐश्वर्य इत्यादींचा महिमा सांगणारे, रहस्य सांगणारे असते. भीष्माचार्यांनी या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून, मंत्रशास्त्राचे अनेक नियम पाळून त्यातून विशिष्ट, प्रभावी स्तोत्ररचना करीत ही सहस्र नामे एकत्र गुंफलेली आहेत. म्हणूनच या श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राला अनन्यसाधारण माहात्म्य लाभलेले आहे.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

0 comments:

Post a Comment