28 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १३

'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र' हा भक्तश्रेष्ठ श्री भीष्माचार्यांनी रचलेला अत्यंत अद्भुत असा एक मालामंत्र आहे. शिवाय यातील प्रत्येक श्लोक हाही स्वतंत्र मंत्र आहे. या विविध मंत्रांचे असंख्य अनुभूत प्रयोगही जुन्या जाणत्या महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहेत. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या 'श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य' ग्रंथामध्ये त्यांच्या श्रीगुरुपरंपरेने आलेले अतिशय प्रभावी असे यातील एकवीस मंत्रांचे प्रयोग दिलेले आहेत. हे सर्व स्वानुभूत सिद्ध मंत्रप्रयोग आहेत. आजवर इतरत्र कुठेच यांचा उल्लेखही आलेला नाही. कोणीही श्रद्धेने यांचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतो. आजपासून आपण त्यातील काही मंत्रप्रयोग पाहू या.
१. इच्छापूर्ती होण्याकरिता मंत्र
असंख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्ट: शिष्टकृच्छुचि: I
सिद्धार्थ: सिद्धसंकल्प: सिद्धिद: सिद्धिसाधन: II४०II
अर्थ :-
असंख्येय: - ज्याच्यात नाम, रूप इत्यादी भेद नाहीत, असा;
अप्रमेयात्मा - ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप होत नाही, असा;
विशिष्ट: - सर्वोत्कृष्ट;
शिष्टकृत् - शासन करणारा;
शुचि: - परम पवित्र;
सिद्धार्थ: - ज्याचे सर्व अर्थ सिद्ध झाले आहेत, असा
सिद्धसंकल्प: - सत्यसंकल्प असलेला;
सिद्धिदः - कर्माचे योग्य फल देणारा;
सिद्धिसाधन: - सिद्धींचा दाता.
या मंत्राचा आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईपर्यंत, शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


0 comments:

Post a Comment