23 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ८

‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’च्या आवर्तनाने ‘नामस्मरण’ तर घडतेच; शिवाय ते नाममंत्रजपाचे शास्त्रोक्त फळ देणारेही ठरते. केवळ ‘शुचिर्भूतता’ एवढाच नियम या स्तोत्राच्या निष्काम-पाठाकरिता, आवर्तनाकरिता पुरेसा असतो. या स्तोत्राची लौकिक फलप्रचिती येण्याकरिता अथवा याच्या मंत्रमयतेची विशिष्ट अनुभूती घेण्याकरिता मात्र त्या त्या विशिष्ट विधानांचे मंत्रशास्त्राप्रमाणे काटेकोर अनुसरण करावे लागते.
नामस्मरणात ‘श्रीभगवंतांचे नाम घेणे’ आणि ‘श्रीभगवंतांचे रूप स्मरणे’ अशी दोन्ही उपासना-अंगे अंतर्भूत होतात. म्हणूनच ‘नामस्मरण’ म्हणजे ‘नाम+स्मरण’ अशी फोड प.पू.सद्गुरु श्री.मामा नेहमी करीत. प्रेम हा नामसाधनेचा पाया असल्याने; आणि ते भगवत्कृपेने, सद्गुरुकृपेनेच साधकाच्या अंतःकरणात आपोआप स्फुरणारे असल्याने; ‘सद्गुरुप्रदत्त शक्तियुक्त नामदीक्षा’ हीच साधकाला परमार्थाच्या मंदिरात प्रवेश करवून देणारी ठरते. अशा ‘सबीज’ नामस्मरणानेच परमार्थातील सर्वोत्कृष्ट स्थिती हळूहळू प्राप्त करून घेता येते.
नुसते नाम घेणे आणि कृपेसहित, शक्तिसहित आलेले नाम घेणे यात महदंतर असते. जेव्हा नुसतेच नाम घेतले जाते, तेव्हा त्या नामामधली शक्ती झाकलेली, सुप्त असते. पण सद्गुरूंच्या आज्ञेने नाम घेतले, त्यांनी दिल्यानंतर ते शक्तियुक्त नाम घेतले, तर त्यातली शक्ती देखील क्रियाशील होते व ती आपला अनुभव द्यायला सुरुवात करते.
नाम हे जरी एकच असते; पण त्यामध्ये ज्या प्रकारच्या शक्तीची जागृती झाली असेल त्याप्रमाणे ते नाम तसे तसे फळ देत असते. जर सद्गुरुसंकल्पाप्रमाणे त्या नामामधली आत्मप्राप्ती करवून देणारी शक्ती जागृत झालेली असेल, तरच ते नाम ‘आत्मप्राप्ती’ही करवून देते. कार्यशक्तीच्या भिन्नत्वामुळे एकाच नामाचे भिन्न भिन्न अनुभव येत असतात.
'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'त उपासकाच्या अंत:करणात आस्तिक्यभावना आणि श्रद्धा निर्माण करण्याचे जबरदस्त सामर्थ्य आहे. नित्यनेमाने त्याचे पाठ केले असता, उपासकाच्या वृत्तींमध्ये आमूलाग्रबदल घडत जातो. त्याची वृत्ती आपोआप परमार्थानुकूल होत जाते. म्हणूनच; दररोज श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणावे, असे श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांपासून आजवरचे सर्व संत सांगत आले आहेत. या स्तोत्राची साधना साधकाला ऐहिक-पारमार्थिक असा उभयविध लाभ करवून देणारी आहे !
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

0 comments:

Post a Comment