21 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ६


भगवान श्रीमहाविष्णूंच्या विविध लीलांचे संदर्भ सांगणारी, त्यांच्या अलौकिक गुणांचे वर्णन करणारी किंवा माहात्म्य सांगणारी एक हजार नामे एकत्र करून श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र रचलेले आहे. ही सर्वच नामे मूळचीच सिद्ध असली तरी यातील काही नामे अधिक प्रसिद्ध आहेत.
भगवान श्रीविष्णूंची बारा रूपे, बारा नामे मंत्रशास्त्रात विशेष प्रसिद्ध आहेत.
(१) केशव - लांब केस असलेले,
(२) नारायण - शेषशायी,
(३) माधव - मायापती, रमापती,
(४) गोविन्द - पृथ्वीचे रक्षक,
(५) विष्णु - सर्वव्यापक,
(६) जनार्दन - भक्तरक्षक,
(७) उपेन्द्र - इन्द्राचे बंधू,
(८) हरि - दुःख, दारिद्र्य, पाप आदि हरण करणारे,
(९) वासुदेव - अंतर्यामी,
(१०) कृष्ण - आकृष्ट करणारे,
(११) राम - रमणकर्ता,
(१२) नृसिंह - नर व सिंह उभयरूपी.
मंत्रशास्त्रातील भगवान श्रीविष्णूंचे असंख्य मंत्र मुख्यत्वे या बारा नामांवरच आधारलेले दिसतात. संध्या-वंदनाच्या वेळीही श्रीविष्णूंची अशीच निवडक चोवीस नामे विशिष्ट क्रमाने उच्चारण्याची शास्त्रीय पद्धत आहे. त्यायोगे संध्या-वंदन करणाऱ्या साधकाच्या पापांचा, विघ्नांचा आणि दुःखांचा नाश होत असतो.
वास्तुदोष निवारण होण्यासाठी प.पू.श्री.शिरीषदादा एक अद्भुत प्रयोग सांगतात. देवांपुढे समई लावून 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'चे रोज तीन पाठ याप्रमाणे आठवडाभर पाठ करावेत. याची सुरुवात 'बुधवारी'च करावी. आश्चर्यकारक अनुभव येतो. बाहेरचा, बाधेचा त्रास असल्यास अशा व्यक्तीला रोज सकाळ-संध्याकाळ या स्तोत्राचे पाठ ऐकवावेत. त्रास दूर होतो. श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या नित्य पठणाने शरीरातील नाना व्याधी दूर होऊन एक प्रकारचे दैवी संरक्षक कवच साधकाभोवती निर्माण होत असते.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


0 comments:

Post a Comment