25 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १०


श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्राची किती आवर्तने झाली असतील याची गणनाच आपण करू शकणार नाही. किंबहुना एवढी आवर्तने झालीत म्हणूनच हे स्तोत्र असे अलौकिक प्रभावी ठरलेले आहे.
आजवरच्या असंख्य महात्म्यांनी या स्तोत्राची स्वत: अनुभूती घेऊन लक्षावधी भक्तांना याची उपासना दिलेली आहे. अनेक संतांच्या चरित्रात या स्तोत्राशी संबंधित अद्भुत हकिकती वाचायला मिळतात. पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी त्यांच्या 'श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य' या पुस्तकात असे भरपूर प्रसंग कथन केले आहेत. त्यातील काही आपण मुद्दाम पाहूया.
शिर्डीत असताना एक रामदासी बुवा श्रीसंत साईबाबांच्या समोर 'अध्यात्म रामायण’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ यांची पारायणे करीत असे. एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखी आणून देण्यास बाबांनी त्याला सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो रामदासी आपल्या पोथ्या गुंडाळून ठेवून बाजारात गेला असता, बाबांनी त्याच्या दप्तरातील ‘विष्णुसहस्रनामा’ची पोथी काढून घेतली आणि ती परमभक्त शामाच्या हातात देऊन बाबा त्याला म्हणाले की, “एकदा माझे प्राण कासावीस झाले. त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून त्याचे पारायण केले; आणि मला अलभ्य लाभ झाला; प्रत्यक्ष श्रीभगवंतांचे दर्शन झाले ! म्हणून तूही रोज हे वाचीत जा. किमान एक नाम वाचण्याचा प्रयत्न केलास तरी चालेल !” या प्रसंगावरून, श्री साईबाबांसारख्या अवतारी सत्पुरुषांचीही केवढी गाढ श्रद्धा या स्तोत्रावर होती, हे कळून येते.
श्रीसंत दासगणू महाराजांच्या चरित्रातही ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’च्या प्रभावाने त्यांच्यावरील करणी प्रयोग असफल झाल्याची कथा आली आहे. प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनीही या स्तोत्राची उपासना सांगून अनेकांना दुःखमुक्त, बाधामुक्त केल्याचे दाखले त्यांच्या चरित्रात आहेत.
योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज देखील त्यांचा या स्तोत्राच्या संबंधातला एक सुंदर प्रसंग नेहमी सांगत असत, श्री.मानवतकर महाराजांच्या घरी घडलेला. तो प्रसंग मोठा असल्याने पू.दादांच्या पुस्तकातून मुळातूनच वाचावा. त्याच्या शेवटी पू.श्री.गुळवणी महाराजांनी या स्तोत्राचे सांगितलेले माहात्म्य मात्र येथे आवर्जून देत आहे. श्री महाराज म्हणत, "श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या श्रवण-पठण-चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटांतून तरून जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो. या स्तोत्राच्या शब्दाशब्दांंतून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे !"
योगिराज श्री.गुळवणी महाराज आणि योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे थोर गुरु-शिष्य नित्यनेमाने या स्तोत्राचे पठण करीत असत आणि आपल्या शिष्यांनाही आवर्जून करायला सांगत असत. म्हणूनच या अधिक महिन्याच्या निमित्ताने आता आपण सर्वांनी न चुकता दररोज हे स्तोत्र म्हणायचा किंवा ऐकायचा तरी नियम करू या आणि श्रीभगवंतांच्या दिव्य कृपेची साक्षात् अनुभूती घेऊ या !!
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

0 comments:

Post a Comment