20 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ५


या अतीव प्रभावी अशा 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'च्या फलश्रुतीत, या स्तोत्राच्या श्रवणपठणाची वेगवेगळी फले सांगितलेली आहेत. 'अशुभ टळणे, विजयी होणे, धर्मप्राप्ती होणे, अर्थप्राप्ती होणे, संतती लाभणे, यश लाभणे, मोठेपणा मिळणे, निर्भयता प्राप्त होणे, आरोग्याचा लाभ होणे, संकटनाश होणे'; इत्यादी लौकिक फले; आणि 'पापनाश होऊन ब्रह्मप्राप्ती होणे' हे अलौकिक फल; यांचे वर्णन त्यात येते. पण तेच जर साधकांकरिता थोडक्यात सांगायचे झाले तर, 'प्रेमाने घेतलेले नाम हे अंतःकरणातल्या प्रापंचिक वासना जाळून काढते आणि अंतःकरणात हळूहळू पूर्ण वैराग्य निर्माण करते;' असे सांगता येईल.
श्रीभगवन्नामांचे हे अजब सामर्थ्य जाणूनच पितामह भीष्माचार्य संकेताने सुचवितात की; *भवरोगासाठी श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे रामबाण, जालीम औषध आहे. पण हे केवळ एखादे सुट्टे औषध नाही; तर तेे औषधांचे संपूर्ण दुकानच आहे. म्हणूनच मनुष्याच्या कुठल्या दुःखावर त्या दुकानातले नेमके कुठले औषध द्यावे, ह्याचा विचार जाणत्यांना पृच्छा करूनच समजून घेतला पाहिजे; आणि नेमके तेच औषध रुग्णाने शास्त्रोक्त रितीने घेतले पाहिजे.*
श्री भीष्माचार्यांनी या स्तोत्राच्या रूपाने भवरोगाचे जालीम, रामबाण औषधच साधकांच्या हाती ठेवलेले आहे. ज्या औषधाने भवरोगासारखी महाव्याधी नाश पावते, त्या औषधाने; नव्हे त्या औषधाच्या अंशानेही; लौकिक रोग लीलया नष्ट होतात यात नवल ते काय ?
येथवर श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य थोडक्यात आपण जाणून घेतले आहे. आता पुढील लेखापासून प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी सांगितलेले श्रीविष्णुसहस्रनामातील विविध श्लोकमंत्र व त्यांचे उपयोग आपण एकेक करून पाहूया.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

0 comments:

Post a Comment