भारतीय संस्कृतीमध्ये वेदकाळापासून पाच प्रमुख देवतांची उपासना चालत आलेली आहे. हे पाचही देव परब्रह्मस्वरूप आहेत, एकाच तत्त्वापासून प्रकटलेले आहेत. बाकीच्या सर्व देवता ह्या अंशरूपाने निर्माण झालेल्या आहेत. भगवान महाविष्णू, भगवान शिवशंकर, भगवान गणेश, भगवान सूर्यनारायण आणि भगवती जगदंबा हीच ती पाच प्रमुख परब्रह्मस्वरूप दैवते आहेत. पूर्वी यांच्या अनुयायांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हेवेदावे निर्माण झाले, म्हणून भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी ' पंचायतन पूजा ' सुरू करून दिली. या पाचही दैवतांची प्रत्येकाने पूजा करायची, फक्त आपले आराध्य जे असेल त्याला पाचांमध्ये प्रधान मानून उपासना करायची. अशा प्रकारे तोडगा काढून श्रीशंकराचार्यांनी सामाजिक एकोपा साधला.
भगवान श्रीगणेश हे मूळ परब्रह्माचेच साकार रूप आहे. त्यांचे तत्त्वरूप वेगळे आणि आपल्या डोळ्यांना दिसणारे भावरूप वेगळे. तत्त्वतः ते साक्षात् परब्रह्मच आहेत.
भगवान श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमधून भगवान श्रीगणेशांच्या या तत्त्वरूपाचा मनोज्ञ परामर्ष घेतलेला आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने आपण श्रीमाउलींच्या परमकृपेने त्यांचे हे सांगणे सप्रेम आस्वादूया.
भगवान श्रीमाउली हे खरोखरीच ' ज्ञानेश्वर ' आहेत. त्यांचे शब्द अलौकिकच असतात. वरवर पाहता त्यांचा दिसणारा अर्थ आणि माउलींना अभिप्रेत असणारा अर्थ नेहमी एकच असेल असे नाही. माउलींनी केलेले श्रीगणेश वर्णनही असे बहुपेडी आहे. त्यातील काही भाग आपण पाहूया.
या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या आोवीत माउली आत्मरूपाला वंदन करतात. वास्तविक सगळीकडे प्रथम भगवान श्रीगणेशांना वंदन करण्याची पध्दत आहे. पण माउली दुस-या आेवीत गणेशांना वंदन करतात. त्याचा गर्भितार्थ फार सुंदर आहे.
माउली म्हणतात.
ॐ नमोजी आद्या ।
वेदप्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या ।
आत्मरूप ॥ज्ञाने.१.०.१॥
देवा तूंचि गणेश ।
सकलार्थमतिप्रकाश ।
म्हणे निवृत्तिदास ।
अवधारिजो जी ॥ज्ञाने.१.०.२॥
वेदांनी ज्याचे प्रतिपादन केलेले आहे अशा सर्वात आधीपासून प्रकट असणा-या आणि ज्याला कोणी घडविलेले नाही अशा स्वसंवेद्य असणा-या आत्मरूपाला माझे वंदन असो.
तेच आत्मरूप तत्त्व ' गणेश ' देखील असून सकल मतीचे प्रकाशकही आहे. त्याच तत्त्वाला मी निवृत्तिनाथांचा दास सादर वंदन करून प्रार्थना करीत आहे.
भगवान श्रीमाउलींच्या शब्दांचे अर्थ त्यांच्याच वाङ्ममयातून शोधायचे असतात. इथे त्या आत्मरूप तत्त्वाला म्हणजे कोणाला ते वंदन करीत आहेत? हे जर समजून घ्यायचे असेल तर त्याला लावलेल्या विशेषणांचा अाधी अभ्यास करायला हवा. श्रीमाउली त्या तत्त्वाला ' वेदप्रतिपाद्य ' म्हणतात. हाच शब्द ते ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायातही वापरतात. वेदांनी ज्याचे प्रतिपादन केलेले आहे तो एकमात्र भगवान श्रीकृष्ण परमात्माच आहे.
बाप बाप ग्रंथ गीता ।
जो वेदी प्रतिपाद्य देवता ।
तो श्रीकृष्ण वक्ता ।
जिये ग्रंथी ॥ज्ञाने.११.०.२६॥
वेद ज्याचे प्रतिपादन करतात तो मूळ परब्रह्मस्वरूप परमात्मा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण होत. तोच स्वसंवेद्य असून आत्मरूपही आहे आणि तोच येथे ' गणेश ' रूपाने प्रकटलेला आहे. त्यालाच उद्देशून माउली ' देवा तूंचि गणेश ' असे म्हणत आहेत.
माउलींच्या वाङ्मयाचे साक्षेपी अभ्यासक योगिराज श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज आपल्या " देवा तूंचि गणेश " या ग्रंथात हे स्पष्ट करून सांगतात की, " असे हे गणेश कोण आहेत? माउली म्हणतात, ते गणेश दुसरे कोणीही नाहीत, तर प्रत्यक्ष परब्रह्म किंवा भगवान श्रीकृष्ण गणेश आहेत ! " भगवान श्रीकृष्णांचे एक विशिष्ट कार्यरूप म्हणजे बुद्धीचे दैवत असणारे भगवान गणेश आहेत. गण म्हणजे इंद्रिये. आपल्या इंद्रियांद्वारे कार्य करते ती आपली बुद्धी, म्हणून बुद्धीचे दैवत असणा-या, पर्यायाने शरीरातील सर्व इंद्रियगणांचे ईश्वर असणा-या गणेशांना माउली ग्रंथारंभी वंदन करून उत्तम मतिप्रकाश करण्याची विनंती करीत आहेत.
श्रीज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीच्या एकोणीस आेव्यांमधून माउलींनी गणेश रूपाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले अाहे. या मंत्ररूप आेव्यांमधून ते गणेशांच्या अलौकिक रूपाचा मार्मिक आकृतिबंधच आपल्यासमोर मांडतात. या सर्व गणेशवर्णनाचे सार सांगताना ते म्हणतात ,
अकार चरणयुगुल ।
उकार उदर विशाल ।
मकार महामंडल ।
मस्तकाकारे ॥ ज्ञाने.१.०.१९॥
गणेश म्हणजे ज्ञान, ज्ञानाचे प्रकटीकरण होते शब्दांच्या माध्यमातून. यच्चयावत् सर्व शब्दसृष्टी निर्माण झालेली आहे. प्रणवातून अर्थात ॐकाराच्या अ उ म या तीन मात्रांमधून. म्हणून ॐकार हेच श्रीभगवंताचे ज्ञानमय गणेशरूप आहे. अकार हा शरीराचा चरणभाग, उकार हे मधले उदर आणि मकार हे मस्तक ; असे हे ॐकारमय श्रीगणेश आहेत. श्रीसंत तुकाराम महाराज देखील " ॐकार प्रधान रूप गणेशाचे । " असेच म्हणतात.
पूजनीय मामासाहेब आपल्या ग्रंथात म्हणतात, " वेदांतील प्रत्येक अक्षर म्हणजे श्रीभगवंतांची मूर्ती आहे. अक्षरेच मंगल करणारी आहेत म्हणून तीच मंगलमूर्ती आहे. भगवंतांचा जन्म होतो तो अक्षरातूनच होतो. भगवंतांचे मूळ स्वरूप हे शब्दब्रह्मानेच नटलेले आहे. म्हणून मंदिरातल्या मूर्तीपेक्षाही भगवंतांच्या या शब्दमूर्तीला, नामाने तयार होणा-या त्यांच्या 'अक्षरमूर्ती'लाच जास्त महत्त्व असते. " या कारणानेच श्रीमाउली ग्रंथारंभी भगवान श्रीकृष्णांच्या अक्षरमय ज्ञानरूप गणेशांना वंदन करीत आहेत.
भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी पहिल्या अध्यायाप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाच्या सुरुवातीलाही वीस आेव्यांमधून भगवान श्रीगणेशांचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. पहिल्या अध्यायात श्रीकृष्णांचे व गणेशांचे एकरूपत्व सांगितले, तसे या सतराव्या अध्यायात ते भगवान गणेश आणि सद्गुरु यांचे एकत्व प्रतिपादन करतात.
वर सांगितलेल्या पंचायतनाची श्रीसद्गुरुतत्त्वामध्येच एकवाक्यता झालेली पाहायला मिळते. श्रीसद्गुरु हे पंचायतनरूप असतात. शिष्यांचे अज्ञान नष्ट करून त्याला ज्ञान देतात, म्हणून ते ज्ञानदायक गणेश असतात. त्याचे मातृवत् पोषण करतात, म्हणून तेच भगवती जगदंबाही होतात. त्याच्या दोषांचा, जीवभावाचा नाश करतात, म्हणून सद्गुरूच संहारक शिवरूपही असतात. त्याच्या परमार्थाचा आणि त्याचाही सर्वबाजूंनी योगक्षेम चालवतात, त्याचा सांभाळ करतात, म्हणून तेच प्रतिपालक विष्णुरूप असतात. त्याच्या हृदयात आत्मज्ञानाचा, स्वरूपबोधाचा प्रकाश करतात, म्हणून तेच ज्ञानतेजोमय सूर्यरूपही असतात.
यातील ज्ञानदायक गणेशरूपाचे सतराव्या अध्यायाच्या नमनात श्रीमाउलींनी फार बहारीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात
विश्वविकासित मुद्रा ।
तया नमो श्री गणेंद्रा ।
श्रीगुरुराया ॥ ज्ञाने. १७.०.१॥
श्री गणेश हे सर्व गणांचे अधिपती आहेत. ते जेव्हा योगनिद्रेत मग्न होतात, तेव्हा माया कार्यरत होऊन विश्वाचा आभास होऊ लागतो, पण जेव्हा ते योगनिद्रेतून जागे होतात तेव्हा संपूर्ण विश्वाचा आभास मावळून त्या जागी आत्मज्ञानाचाच प्रकाश शिष्याला जाणवू लागतो. याचा गर्भितार्थ असा की, जेव्हा शिष्यांवर सदगुरूंची अनुग्रहकृपा होते, तेव्हाच त्याला, तोवर सत्य वाटत असलेला प्रपंच खोटा असल्याचे आपोआप जाणवू लागते; आणि त्याचे लोपलेले मूळचे आत्मज्ञान पुन्हा प्रकट होऊ लागते.
ही प्रकिया सदगुरूंच्या अनुग्रहाने संपन्न होते. म्हणूनच श्रीमाउली ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात श्रीसद्गुरूंच्या अनुग्रह गणेशांचा उल्लेख करतात.
तुमचा अनुग्रह गणेश ।
जैं आपला दे सौरस ।
तैं सारस्वती प्रवेश ।
बाळकाही अाथि ॥ज्ञाने.१०.०.६॥
अहो सदगुरुराया, तुमचा अनुग्रहरूपी गणेश ज्याला आपला प्रसाद देईल, ज्याच्यावर त्याचा प्रसन्न कृपाअनुग्रह होईल, त्या बालकालाही सारस्वतामध्ये, ज्ञानसागरामध्ये सहज प्रवेश मिळेल. इथे श्रीगुरूंच्या गणेशरूपाचा माउली मुद्दामच उल्लेख करीत आहेत. कारण मुळात प्रत्येक जीव हा परब्रह्माचाच अंश आहे. सूर्याचा किरण जसा सूर्यासारखा तेजस्वीच असतो, तसा
प्रत्येक जीव हा श्रीभगवंतांसारखा अानंदमयच आहे, पण मग आम्हाला तो आनंद का जाणवत नाही? याचे कारण आहे माया ! भगवंतांच्या मायाशक्तीमुळे जीव स्वतःला वेगळा मानू
लागतो आणि त्याचक्षणी त्याला सुख-दुःखादी गोष्टींची अनुभूती येऊ लागते. आता भगवंतांच्याच संकल्पाने कार्य करणारी ही माया कोण दूर करणार? त्यासाठी मायिक गोष्टींचा उपयोग नाही. म्हणून भगवंतच ' श्रीसदगुरु ' हे परम करुणामय रूप धारण करून जीवांवरील मायेचे आवरण नष्ट करून त्याचे मूळचे आनंदस्वरूप त्याला पुन्हा प्रदान करतात.
श्रीभगवंत, त्यांची
शक्ती आणि सदगुरु, हे तिन्ही एकरूपच आहेत. त्यासाठी सतराव्या अध्यायातील दुस-या ओवीत माउली म्हणतात,
त्रिगुण त्रिपुरी वेढिला ।
जीवत्वदुर्गीं आडिला ।
तो आत्मशंभूने सोडविला ।
तुझिया स्मृती || ज्ञाने.१७.०.२॥
त्रिपुरासुराची कथा माउली येथे रूपक म्हणून वापरत आहेत, त्रिपुरासुराला ब्रह्मदेवांनी सोने, चांदी व तांब्याची तीन नगरे दिली होती. या मायावी नगरांच्या बळावर तो खूप मातला होता. देवांच्या विनंती वरून मग भगवान श्रीशिवशंकरांनी त्या तीन मायावी नगरांचा नाश करून
त्रिपुरासुराचाही वध केला. त्यासाठी त्यांनी भगवान गणेशांची प्रार्थना केली होती. तोच संदर्भ येथे चपखलपणे वापरून माउली म्हणतात, "हे गणेशरूप सदगुरुराया, सत्त्व, रज आणि तम तीन नगरे असून त्यांच्या जीवरूप किल्ल्यामध्ये अडकून पडलेल्या आत्मरूप शिवशंभूने तुमच्याच स्मरणाची तपश्चर्या करून स्वत:ची त्या संकटातून सुटका करून घेतली." मायेमुळे उत्पन्न झालेल्या जीवत्वाचा अडसर केवळ श्रीसदगुरूंच्याच कृपेने दूर होतो, अन्य कोणत्याही मार्गाने नाही; हेच माउली येथे स्पष्ट करीत
आहेत .
सतराव्या अध्यायाच्या नमनात माउली एका सुंदर ओवीत भगवान श्रीगणेशांचे मार्मिक गुणवर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
जो तुजविखी मूढ ।
तयालागी तूं वक्रतुंड ।
ज्ञानियांसी तरी अखंड ।
उजूची आहासी ॥ज्ञाने.१७.०.४॥
गणेशाची सोंड हे काही त्यांचे तोंड नाही, ते तर नाक आहे, पण सोंड हेच जणू त्याचे तोंड वाटते. म्हणून त्यांना ' वक्रतुंड ' म्हणतात. माउली म्हणतात, हे सदगुरुरूप गणराया, जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत, त्यांना तू वक्रतुंड दिसतोस, म्हणजे तू त्यांना रागावलेला, तिरस्कार करणारा वाटतोस; पण जे तुझ्याविषयी प्रेम बाळगून आहेत, तुझ्या स्वरूपाचे ज्ञान ज्यांना झालेले आहे, त्यांच्यासाठी तू उजू म्हणजे सरळ सोंडेचाच आहेस . त्यांना तू कायम कृपामय, करुणाकरच वाटतोस. माउलींनी गणेशाची सरळ सोंड ही सुविमल विवेकाचे प्रतीक मानलेली आहे. विवेक म्हणजे सारासार जाणण्याची क्षमता. आपल्या परमार्थासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार म्हणजे ' विवेक '. ज्यांना श्रीगणेशांविषयी प्रेम आहे व ज्यांच्यावर गणेशांनी अनुग्रह केलेला आहे, त्यांना कायमच या सुविमल अर्थात् शुद्ध विवेकाची प्राप्ती होते. असा हा विवेक निःसंशय सदगुरुकृपेनेच लाभतो. खरेतर हा विवेकच गुरुकृपा लाभल्याचे प्रथम द्योतक मानतात. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या एका अभंगात म्हणूनच म्हणतात की, "विवेक तो मुख्य कृपेचे लक्षण ।"
या विवेकाला इतके का बरे महत्त्व दिलेले आहे? कारण; जेथे विवेक असतो तिथेच साधनेने पुढे ज्ञान प्रकट होऊन परमानंदाची, महासुखाची प्राप्ती होत असते. श्रीगुरूंनी दाखवलेल्या मार्गानेच
अत्यंत प्रेमाने व निष्ठेने साधना केल्यावर आपण विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन पोहोचतो. तिथे जन्मजन्मांतरी बुद्धीने साठवलेले कर्मांचे संस्कार स्वच्छ धुतले जाऊन बुद्धी शुद्ध
होते. आणि त्यानंतरच खरेतर आपल्याला आत्मसुखाची प्राप्ती होते.
भगवान श्रीमाउलींनी ज्ञानमय परब्रह्मस्वरूप श्रीगणेशांचे असे विविधांगी वर्णन करून ठेवलेले आहे. त्या अमृतसागरातील ही लहानशी आेंजळ त्यांच्याच कृपेने आपण प्राशन करीत आहोत. हे भाग्य काय लहान थोडीच आहे? हा ही आपल्यावरचा श्रीमाउलींचा गणेशकृपा-सौरसच जणू !
भगवान श्रीमाउलींच्या परमकृपेने, माघी श्रीगणेश जयंतीच्या निमित्ताने संपन्न झालेली ही श्रीगणेश गुणवर्णन सेवा, श्रीगणेशरूप श्रीसद्गुरूंच्याच श्रीचरणीं सादर समर्पित असो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.
अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )