26 May 2016

चोखा चोखट निर्मळ अंतर्बाह्य गंगाजळ



आज वैशाख कृष्ण पंचमी, भगवान सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउलींच्या शिष्य प्रभावळीतील, नावाप्रमाणेच विशुद्ध, चोख विभूतिमत्व असणा-या श्रीसंत चोखामेळा महाराजांची आज पुण्यतिथी आहे.
पंढरपुरातील थोर हरिभक्त संतांच्या यादीत श्रीसंत चोखामेळा महाराजांचे नाव अग्रणी आहे. ते श्रीसंत नामदेवरायांचे शिष्योत्तम होते. श्रीनामदेवांच्या कुटुंबाप्रमाणेच, श्रीचोखोबा, त्यांच्या पत्नी सोयराबाई, पुत्र कर्ममेळा, बहीण निर्मळा, मेव्हणा बंका असे सारे पूर्ण हरिरंगी रंगलेले भगवद् भक्तच होते. काय त्या अलौकिक काळाच्या भाग्याचे वर्णन करणार? अठरा पगड जातीतील सगळे संत त्या काळात माउलींच्या छत्रछायेत नवनवीन उत्साहाने भक्तीचा डांगोरा पिटत होते. मोठ्या आनंदाने हरिभक्तीत रममाण झालेले होते.  या सर्व संतांचा चोखोबांना भरपूर सहवास लाभला आणि त्यांनी या अक्षर सहवासाचे खरोखरीच सोने केले. त्याच्या बळावर अनंत असा परमात्मा हृदयी पूर्णपणे धारण केला.
संतांचा आणि त्यांच्या प्रेममत्त, भावपूर्ण वाङ्मयाचा अभ्यास हा लौकिक मोजपट्ट्यांनी आणि अननुभूत काल्पनिक निकषांच्या कमकुवत आधारावर कधीच करायचा नसतो. किंबहुना तसा जर अभ्यास केला तर तो अभ्यास न होता केविलवाणा कल्पनाविलासच अधिक ठरतो; आणि ती शब्दांची वायफळ कसरत ' बोलाचीच कढी बोलाचाच भात ' होऊन शेवटी ख-या आनंदाची भूक अतृप्तच राहाते.
श्रीसंत चोखोबारायांच्या बाबतीत अनेक अभ्यासकांची हीच गफलत झालेली दिसून येते. ते हिरीरीने तत्कालीन विषम जातिव्यवस्थेचा चोखोबांना व त्यांच्या कुटुंबाला कसा त्रास झाला, याची त्यांच्या तसे वर्णन असणा-या एखाददुस-या अभंगाचा आधार घेऊन निरर्थक मांडणी करीत बसतात. पण त्या भानगडीत चोखोबांच्या चोख सोन्यासारख्या खणखणीत आत्मानुभूतीचा आस्वाद घ्यायचे, त्यांच्या अद्भुत अंतरंग प्रचिती-प्राजक्ताचा संपन्न फुलोरा पाहायचे, त्याचा तो स्वर्गीय सुगंध आतबाहेर अनुभवायचे साफ विसरूनच जातात. चोखोबारायांची ही जगावेगळी, विलक्षण आत्मप्रचितीच जर पाहायची राहिली तर मग बघितले तरी काय? वेळ वायाच घालवला नाही का?पंचपक्वान्नांचे ताट समोर वाढलेले असताना केवळ ताक पिऊन उठल्यासारखेच आहे हे. पण भगवंतांच्याच प्रेरणेने काही महाभागांच्या नशीबी तेच लिहिलेले असते. आपण मात्र भरपेट जेवावे, हेच बरे. ज्या लौकिक गोष्टींची चोखोबांनी उभ्या आयुष्यात कधीही तमा बाळगली नाही, आपल्या स्वानंदामृताला  असल्या कोणत्याच मर्त्य गोष्टींचा विटाळ होऊ दिला नाही, त्याच फक्त जर आम्ही धरून बसलो व त्यावरच जर मांडणी करीत बसलो, तर तो चोखोबांचा व त्यांच्या वैभवसंपन्न शब्दब्रह्माचा, त्यांच्या रोकड्या आत्मप्रचितीचा घोर अपमानच ठरेल. म्हणून त्यांच्या या प्रारब्धजन्य भागाचा आपण विचार टाळून केवळ चोखोबांच्या नावाप्रमाणेच चोख विभूतिमत्त्वाचाच विचार करूया.
त्यांची अभंगरचना खूप सुंदर आणि निगूढ योगानुभूती सहजपणे सांगणारी आहे. त्यांच्या निर्मळ, प्रेमरंगी रंगलेल्या भाविक अंत:करणाचे आरस्पानी प्रतिबिंब त्यांच्या अभंगांमध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळते. त्या काळातील आश्चर्यच म्हणावे पण, अनंतभट नावाच्या पंढरीतीलच एका ब्राह्मण भक्ताने चोखोबांची सर्व अभंगरचना लिहून ठेवून आपल्यावर फार मोठे उपकारच केलेले आहेत.
श्रीचोखोबा सद्गुरुकृपेने आलेली मनोहर ज्ञानानुभूती सुरेख शब्दांत वर्णिताना म्हणतात,
देहीं देखिली पंढरी ।
आत्मा अविनाश विटेवरी ॥१॥
तो हा पांडुरंग जाणा ।
शांति रुक्मिणी निजांगना ॥२॥
आकारलें तितुके नासे ।
आत्मा अविनाश विठ्ठल दिसे ॥३॥
ऐसा विठ्ठल हृदयी ध्यायीं ।
चोखामेळा जडला पायी ॥७६.४॥
कोण म्हणेल की, असली भन्नाट योगानुभूती सांगणारा महात्मा लौकिक जगात निरक्षर होता? अहो, अक्षर परब्रह्माचा साक्षात्कार झालेलाच खरा " साक्षर " असतो. सगळ्या जगाचे ज्ञान आपल्यालाच आहे, या भ्रमात राहणारे बाकी आपल्यासारखेच सगळे खरेतर निरक्षर म्हणायला हवेत !!!
सोयराबाई, कर्ममेळा, निर्मळा, बंका या सगळ्यांचेच अभंग खूप सुंदर आणि अद्भुत योगानुभूती सांगणारे आहेत. हे सर्वजण श्रीचोखोबांचे अनुगृहीत होते. श्रीसोयराबाईंचा दैवी स्वानुभव मांडणारा एक अभंग तर सर्वांनाच माहीत आहे, तो म्हणजे, " अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥ "  या श्रीरंगी सप्रेम रंगलेल्या सोयराबाईंचे बाळंतपण स्वत: भगवान पंढरीनाथांनी व श्रीमुक्ताबाईंनी मिळून केले होते. केवढे अलौकिक भाग्य  !! त्या बाळंतपणात जन्मलेले कर्ममेळा हेही संतच झाले, यात नवल ते काय? म्हणूनच श्रीचोखोबा व त्यांच्या अवतारी परिवार सदस्यांचे अभंग-अमृत प्रत्येक भक्ताने आपल्या आयुष्यात एकदातरी प्रेमाने वाचून, जाणून घेऊन आकंठ प्राशन केलेच पाहिजे.
चोखोबा पंढरीत महारकी करत असत. त्यांच्या प्रेमाखातर, त्यांचा सहवास लाभावा म्हणून, प्रत्यक्ष पंढरीनाथ भगवान त्यांच्यासोबत गावात मेलेली गुरे ओढून नेऊन त्यांची विल्हेवाट लावत असत. अशी आख्यायिका संत आपल्या अभंगात सांगतात की, एकदा स्वर्गीचे अमृत विटले. ते पुन्हा कसे शुद्ध करायचे? असा गहन प्रश्न इंद्रादी देवतांसमोर पडला. त्यावर भगवंतांनी उपाय सांगितला की, " पंढरीत जाऊन आमच्या स्मरणात निरंतर निमग्न होऊन राहिलेल्या चोखोबांचा स्पर्श त्या अमृताला करवून आणा, ते तत्काळ शुद्ध होईल. " भगवंतांच्या आज्ञेने इंद्रदेवांनी पंढरीत येऊन चोखोबांची प्रार्थना करून अमृत पुन्हा शुद्ध करवून नेले. किती गंमत आहे पाहा, लौकिक जगात ज्यांना " अस्पृश्य " मानून मूर्ख समाज दूर ठेवत होता, ज्यांच्या अंगावरचा वारा लागला तरी विटाळ मानत होता, त्या चोखोबांच्या केवळ एका स्पर्शासाठी अलौकिक जगात अहमहमिका लागलेली होती  !! भगवद्भक्तांच्या निर्मल यशाचे, सर्वगुणसंपन्न महिम्याचे हे अद्भुत दर्शन स्तिमित करणारेच आहे.
एकदा पंढरपूर जवळच्या मंगळवेढा गावांत गांवकुसाची भिंत बांधण्यासाठी पंढरीतले सगळे महार मजूर नेण्यात आले होते. ती अर्धवट बांधलेली भिंत अचानक पडल्याने त्याखाली चिरडले जाऊन श्रीचोखोबांचा आजच्या तिथीला लौकिक अर्थाने मृत्यू होऊन ते भगवंतांशी पूर्ण एकरूप झाले.
पण भगवान पंढरीनाथांना आपल्या या लाडक्या भक्ताचा विरह काही सहन होईना, म्हणून त्यांनी श्रीनामदेवांना पाठवून चोखोबांच्या अस्थी आणायला सांगितल्या. त्या कशा ओळखणार? असे नामदेवांनी विचारल्यावर देव म्हणाले की, " ज्या अस्थींमधून विठ्ठलनाम ऐकू येईल, त्या अस्थी नि:संशय माझ्या चोख्याच्याच समज. " आपल्या अनन्य भक्ताची केवढी खात्री आहे पाहा देवांना. मेला तरी त्याची निर्जीव हाडे सुद्धा निरंतर नामच घेत असतील, असे ते भगवंत आवर्जून सांगत आहेत. नामदेवरायांनी त्यानुसार त्या अस्थी बरोबर शोधून आणल्या. भगवान पंढरीनाथांना चोखोबांचे इतके प्रेम होते की, लहान बाळाला कुशीत घ्यावे त्याप्रमाणे देवांनी अतीव प्रेमभराने त्या अस्थी आपल्या उपरण्यात घेतल्या व स्वहस्ते त्यांना मंदिराच्या महाद्वारासमोरच समाधी दिली, लाडका भक्त सतत डोळ्यांसमोर राहावा म्हणून ! त्यावर स्थापन झालेल्या समाधिशिलेचीच आजही पूजा होत असते. ही घटना वैशाख वद्य त्रयोदशीला संपन्न झाली. आजही पंढरी भूवैकुंठातील भगवान पंढरीनाथांच्या दरबारात आणि आपल्या सद्गुरूंच्या, श्रीनामदेवरायांच्या पायरीच्या समोरच श्रीचोखोबा अढळपदी विराजमान होऊन निरंतर विठ्ठलनाम घेताना दिसतात. त्यांच्या अपूर्व गुरुभक्तीचा याहून मोठा सन्मान काय असेल बरे?
अंतर्बाह्य चोख, सोन्यासारखा शुद्ध, लखलखीत आणि श्रीभगवंतांशी अखंड एकरूप होऊन राहिलेला म्हणजेच " चोखा-मेळा " ! अशा या थोर भगवद् भक्ताच्या पावन पुण्यदिनी त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत  !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://rohanupalekar.blogspot.com/

12 comments:

  1. Bhannat adbhut rasal ani abhyaspurn lekh

    ReplyDelete
  2. ।।श्रीगुरू:शरणं।।
    अत्यंत सुंदर लेख. आपले भाग्य थोर अश्या प्रकारची लेक्गं सेवा आपल्या हातून भगवंत करून घेत आहेत!

    ReplyDelete
  3. अद्भुत, अलौकिक असे श्री संत चोखोबा महाराज यांचे चरित्र..
    किती जाणून घ्यावे तरि त्रुप्ती होत नाही .
    अतिशय सुरेख आणि रसाळ असा लेख लिहून share केल्याबद्दल मनापासून धन्यवाद !! 🙏🙏

    ReplyDelete
  4. "सदगुरु नि शिष्य" आणि 'असदगुरु नि असदशिष्य' यांची ओळख चोखोबांच्या चाळणीने, चोखोबांसारख्या नित्यसाधक भक्तांना खरे ओळखण्यातुन होते.

    तो आंतरिक साधनानंद जाणला, 'मी' चे, 'अहं' चे, बाह्य-जगताचे विस्मरण झाले, आंतरिक सत-चित-आनंदरुपाशी एकतानता साधता आली, 'काही हवे नको' चे विस्मरण झाले - आणि हे सारे अगदी सहज, साहजिकतेने, विनासायास झाले कि मग चोखोबा समजतो.

    चोखा चोखट निर्मळ | तया अंगी नाही मळ ||
    चोखा प्रेमाचा सागर | चोखा भक्तिचा आगर ||
    चोखा प्रेमाची माउली | चोखा कृपेची साऊली ||
    चोखा मनाचे मोहन | बंका घाली लोटांगण ||
    - संत बंका

    चोखा माझा जीव चोखा माझा भाव | कुलधर्म देव चोखा माझा ||
    काय त्याची भक्ति, काय त्याची शक्ति | मोही आलो व्यक्ति तयासाठी ||
    माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान | तया कधी विघ्न पडो नेदी ||
    नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी | घेत चक्रपाणी पितांबर ||
    -संत नामदेव

    तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ | तारिले पतित तेणे किती ||
    - संत तुकाराम

    चोखामेळियाची ऐकोनी करुणा | चालिले भोजना देवराव ||१||
    नामदेवासहित अवघे गणगंधर्व | इंद्रादिक देव चालियले ||२||
    जाउनी नारद सांगे चोखियासी | तुझिया घरासी येती देव ||३||
    ऋध्दिसिध्दि आल्या चोखियाचे घरीं | जाहला ते सामोग्री भोजनाची ||४||
    रुक्मिणीसहित आला पंढरीनिवास | चोखियाचे घरास आले वेगीं ||५||
    चोखामळा गेला पुढें लोटांगणी | उचलोनि देवांनी आलंगिला ||६||
    एका जनार्दनीं ऐसा चोखियाचा भाव | जाणोनी आले देव भोजनासी ||७||
    - एकनाथी गाथा, भाग पाचवा

    चोख्याचे अंगणीं बैसल्या पंगती | स्त्री ते वाढिती चोखियाची ||१||
    अमृताचें ताट इंद्रें पुढें केलें | शुध्द पाहिजे केलें नारायणा ||२||
    तेव्हां देवराव पाचारी चोखियासी | शुध्द अमृतासी करी वेगीं ||३||
    चोखामेळा म्हणे काय हें अमृत | नामापुढें मात काय याची ||४||
    अमृताचे ताट घेउनी आला इंद्र | हेतु गा पवित्र करी वेगीं ||५||
    चोखियाची स्त्री चोखा दोघेजण | शुध्द अमृत तेणें केलें देखा ||६||
    चोखियाच्या घरीं शुध्द होय अमृत | एका जनार्दनीं मात काय सांगू ||७||
    - एकनाथी गाथा, भाग पाचवा

    शेवट करताना पदरचे घालून म्हणावेसे वाटते कि,

    चोखा अंतरी चोखट | बाह्य शोधे बहिरट ||
    शब्द करें कटकट | कर्ण शोधे वटवट ||
    अंतरी निमे तो साधक | बाह्ये शोधे तो मारक ||
    गुरुपदी ठेवी माथा | तरी साधें सकळ गाथा ||
    - श्रीकृष्ण वसंत
    वैशाख कृष्ण पंचमी
    ५ मे २०१८
    श्री संत चोखामेळा महाराज पुण्यतिथी


    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त

    ReplyDelete
  5. श्रीकांत पुराणीकाण्चाही लेख अप्रतीम !

    ReplyDelete
  6. चोखोबांची इतकी व्यवस्थित माहिती प्रथमच समजली! धन्यवाद!!

    ReplyDelete
  7. नमन संत चोखोबा काकांना

    ReplyDelete
  8. श्री संत चोखोबा रायान्ची खरी लौकिक व अलौकिक अर्थाने ओळख या आपल्या भावपूर्ण लेखामधून होते आहे..
    मनाचा ठाव घेणारा व आन्तरिक विचार करायला लावणारा लेख लिहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार..🙏🙏🙏

    ReplyDelete
  9. चोखा मेळा या नावातच केव्हडा अद्भुत अर्थ भरलाय!! असे संत महाराष्ट्र भूमीत जन्मले हे आपलं केव्हढं भाग्य!!
    बायको बाळंतीण व्हायची वेळ आली, म्हणून चोखोबा नदीपालिकडे गावाकडे सुईणीला आणायला म्हणून गेले ते रस्त्यात कीर्तन चाललं होतं तेथे थांबले आणि विसरून गेले , कीर्तन संपल्यावर एकदम आठवण आली, घरी जाऊन बघतात तर सुईण येऊन बाळंतपण करून गेली होती, तेव्हा उलगडा झाला की स्वतः पंढरीनाथ ,मुक्ताई येऊन बाळंतपण करून गेले
    आता धन्य कोणाला म्हणायचं? चोखोबाना की विठ्ठलाला की जो आशा भक्तांवर इतका मोहित होतो?

    ReplyDelete
  10. अप्रतिम लेख. थक्कच झालो. धन्यवाद रोहन जी.

    ReplyDelete
  11. माझं प्रांजळ मत असं आहे की ही सर्व संत मंडळी प्रारब्धानुसार वेगवेगळ्या ज्ञातोत लौकिक दृष्ट्या जरी जन्माला आली असे वरवर वाटले तरी ते मनोमन पटत नाही, माझ्या मते हे त्या परमात्म्याचे अंशावतारच होत, त्यांना कसलं प्रारब्ध आलंय? केवळ बहुजन समाजाला आपल्याही ज्ञातीत संत जन्माला हा आनंद मिळावा आणि बहुजन समाज भक्तीकडे ओढला जाऊन अंती मोक्षाप्रत जावा या हेतूने परमेश्वरांनी निरनिराळ्या ज्ञातीत जन्म घेतला,हीच जणू परमेश्वरी योजना असावी🙏🙏🙏संत चोखोबाना सहस्र दंडवत!!

    ReplyDelete